Soil Testing- (माती परीक्षण) - फायद्याची शेती
माती परीक्षण - फायद्याची शेती
मित्रहो,
पारंपारिक शेती कडून आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे, हे कटुसत्य असून सर्व ह्याबाबत ज्ञात आहेत. तथापि
पारंपारिक शेतीमधील बऱ्याच गोष्टी अजूनही टिकवून ठेवणे, ही सुद्धा काळाची गरज आहे,
त्याचाच अर्थ पारंपारिक शेती व आधुनिक तंत्रज्ञान या दोघांची सांगळ घालून आधुनिक
शेती करणे हे शेतकर्यांकरिता जास्त महत्त्वाचे वाटते. याचाच एक भाग म्हणजे
शेतीच्या हंगामाला सुरवात करण्याअगोदर शेतीच्या तब्बेतीची (SOIL HEALTH) तपासनी करून घेणे हे शेतकऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. आणि
त्याकरिता माती परीक्षण करणे खूप खूप गरजेचे असते.
तर चला आज माती परीक्षणाबाबत
जाणून घेऊ या..........
माती परीक्षण म्हणजे जमिनीमध्ये किती प्रमाणात
नैसर्गिकरित्या अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, आणि ते आपल्या पिकाला किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकते, याची चाचणी करून अहवाल प्राप्त करणे होय.
साधारणतः शेती करतांना आपण लागवड केलेल्या पिकाला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता
असते, त्यांची पूर्तता आपण वेगवेगळ्या खतामधून करीत असतो,
परंतु माती परीक्षण केल्याने आपल्या जमिनीमध्ये कोणत्याप्रकारची अन्नद्रवे
नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत, त्याची माहिती मिळते आणि त्यानुसार आपण घेणार असलेल्या
पिकाला कोणते अन्नद्रव्य, किती प्बारमाणात बाहेरून देण्याची गरज आहे, याचा अचूक निर्णय घेता येतो
जेणेकरून आपण पैशाचा अपव्यय टाळून पिकाला आवश्यक अन्नद्रव्याची पूर्तता करून
अपेक्षित उत्त्पन्न घेऊ शकतो.
माती परीक्षण कश्याप्रकारचे असते ?
माती परीक्षण हे साधारणतः ०२ प्रकारचे असते-
१) मुख्य अन्नद्रव्ये (नत्र : स्फुरद : पालाश), तसेच
जमिनीचा सामू व सेंद्रिय कर्ब याबाबत परीक्षण करणे, तसेच
२) मुख्य अन्नद्रव्याबरोबरच (नत्र : स्फुरद : पालाश) सुक्ष्म
अन्नद्रवे (जसे- बोरॉन, केल्शीयम, मेग्नेशियम,
सल्फर, आयरन, कॉपर, झिंक,
मोलीबडेनम, मेंगनीज या बरोबरच जमिनीचा सामू (PH) व सेंद्रिय
कर्ब याबाबत परीक्षण करणे.
माती परीक्षण कधी करावयाचे ?
साधारणतः दरवर्षी माती परीक्षण करून घ्यावे.
माती परीक्षणासाठी
मातीचा नमुना कधी गोळा करावयाचा ?
१) एप्रिल
- मे महिन्यात उन्हाळ्याच्या सीजन मध्ये किंव्हा
२) खरीप
पीक काढणी झाल्यावर मातीचा नमुना गोळा करून परीक्षनाकरिता
पाठवावे.
मातीचा नमुना घेण्यासाठी लागणारी आवश्यक सामग्री-
१) माती खोदण्याकरिता सॉईल अगर, सॉईल अगर उपलब्ध नसेल तर खुरपे, फावडे, किंव्हा कुदळ, २) माती गोळा करण्याकरिता घमेले, ३) मातीचा नमुना भरण्यासाठी पॉलीथिन किंव्हा कापडी पिशवी. आदी,
मातीचा नमुन्याकरिता कोणत्या ठिकाणाहून माती गोळा करू नये ?
१) जनावरांच्या
गोठ्या जवळील जागा, २)
पाण्याजवळील किंव्हा पाटाजवळील जागा, ३)
उकीरड्याची जागा, ४)
बांधाची जागा, ५)
झाडाखालील जागा, ६)
नुकतेच खत टाकलेली जागा, ७)
दलदलीची जागा, आदी
ठिकाणाहून माती घेऊ नये.
माती परीक्षनाकरिता मातीचा नमुना कसा घ्यायचा ?
·
शेतीच्या एकलग असलेल्या प्लॉटमधून एक
नमुना घ्यावा.
·
शेताच्या संपूर्ण क्षेत्राचे अंदाजे १०-१२
भागात विभागणी करावी. विभागणी करतांना जमिनीचे पूर्ण क्षेत्राचा समावेश होईल व
पूर्ण भागातून प्रतिनिधिक स्वरुपात माती नमुना येणार याची काळजी घ्यावी. जेणेकरून चोपण
माती, काळी माती, मुरमाड जमीन अश्या सर्व प्रकारच्या
मातीचा समावेश नमुन्यात होणार.
·
नमुन्याकरिता माती घेताना प्लॉटची
विभागणी केल्यानुसार १० ते १२ ठिकाणाहून (Zig-Zag) नागमोडी पद्धतीने स्पॉट निवडून त्या ठीकानाहून माती
गोळा करावी.
·
मातीचा नमुना घेण्याकरिता जमिनीत
इंग्रजी व्हीं (V) आकाराचे खड्डे करावे.
१. हंगामी पिकाकरिता 20-25 सेमी,
२. फळबाग
करिता 60 सेमी,
३. बागायती
पिके 40 सेमी, आकाराचे खड्डे करून १०-१२
ठिकाणची माती गोळा करावी
·
इंग्रजी व्हीं (V) आकाराचा तयार झालेल्या खड्ड्यातून कोपऱ्याच्या बाजूने साधारण ४-५ सेमी. (२-३ इंच)
जाडीची माती खुरपीच्या सहाय्याने वर पासून खाल पर्यंत काढून घमेल्यात गोळा करावी.
अश्याप्रकारे निवड केलेल्या १० ते १२ ठिकाणाहून माती घमेल्यात एकत्र गोळा करावी.
·
संपूर्ण स्पॉट मधून गोळा केलेली माती एखाद्या
सिमेंट प्लॉटफार्मवर किंव्हा पॉलीथिन वर पसरून, बारीक करून पद्धतशीरपणे चांगली
मिसळून घ्यावी. त्यामध्ये असलेला कचरा, मुळ्या, किंव्हा इतर काही असल्यास
त्याला वेगळे करावे.
·
बारीक करून योग्यरीत्या मिसळलेल्या मातीचे
समान चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावे. उरलेल्या मातीचे पुन्हा चार
भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावे. ही प्रक्रिया पुनःपुन्हा करत राहावी, जेव्हापर्यंत शेवटी कमीत-कमी अर्धा किलो माती शिल्लक राहील.
·
शेवटी शिल्लक राहिलेल्या अर्धा किलो
मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवी मध्ये किंव्हा पॉलीथीन मध्ये भरून व्यवस्थितपणे बांधून
घ्यावे. त्यावर खालील माहिती लिहून तपासणी करिता पाठवावे.
मातीच्या नमुन्याबरोबर द्यावयाची आवश्यक माहिती...
१. शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल
क्रमांक, २. नमुना घेतल्याची तारीख, ३. सात-बारा
क्रमांक ४. जर एकापेक्ष्या जास्त शेताचे नमुने असल्यास प्रत्येक नमुन्याला नमुना क्रमांक
द्यावा., ५. मागील
वर्षी घेतलेली पिके, ६. पुढील वर्षी घ्यावयाची पिके याची
माहिती. ७. नमुना किती खोलीपर्यंत घेतला, आदी माहिती नमुन्याबरोबर देणे आवश्यक
आहे.
शासनाच्या
प्रत्येक जिल्ह्यात माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत, त्याठिकाणी माती परीक्षण करून
मिळेल तसेच, आपल्या जवळील कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, किंव्हा खासगी
माती परीक्षण प्रयोगशाळा यांमध्ये माती परीक्षण करून मिळत असते. त्याठिकाणी नमुना
पोहचवून माती परीक्षण करून घ्यावे.
माती
परीक्षण रिपोर्ट मध्ये परीक्षणानुसार मातीचा सामू (PH), सेंद्रिय
कर्ब, नत्र: स्फुरद: पालाश (N:P:K) यांचे नैसर्गिकरित्या असलेले प्रमाण दर्शविलेले
असते व त्याबरोबरच आपण घेणाऱ्या पिकाला किती प्रमाणात इतर बाहेरील खते द्यावेत
याबाबत नमूद केलेले असते. तसेच आपण जर इतर सूक्ष्मअन्नद्रव्य परीक्षण करण्यास
सांगितले असल्यास त्याचे प्रमाण रिपोर्ट मध्ये दर्शविलेले असते व त्यानुसार
आपल्याला पीकानुसार किती प्रमाणात व कोणती खते टाकावी याबाबद माहिती मिळते.
शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत जर, १) मुख्य अन्नद्रव्ये (नत्र : स्फुरद : पालाश)
परीक्षण करावयाचे असेल तर त्याकरिता साधारणतः रू. ५० ते १०० पर्यंत फी आकार लागेल, तर २) मुख्य अन्नद्रव्याबरोबरच (नत्र : स्फुरद : पालाश) सुक्ष्म अन्नद्रवे
(जसे- बोरॉन, केल्शीयम, मेग्नेशियम,
सल्फर, आयरन, कॉपर, झिंक,
मोलीबडेनम, मेंगनीज याबाबत परीक्षण करण्याकरिता रू. ६०० ते ७०० पर्यंत फी आकारणी
केली जाऊ शकते. खाजगी प्रयोगशाळेत कमी-अधिक प्रमाणात फी आकारली जाऊ शकते.
माती परीक्षण करण्यास कामाच्या भारानुसार कमी अधिक
कालावधी लागू शकतो, परंतु
शक्यतो १५ दिवस ते १ महिन्याच्या आत माती परीक्षणाचा अहवाल प्राप्त होऊ शकतो.
************************

Comments
Post a Comment