अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे
अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे
अंजीर मध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.
अंजीर खाण्याचे फायदे :
१) अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.
२) अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (अॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते.
३) कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.
४) पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.
५) अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.
६) अंजीराच्या नियमित सेवनाने सप्तधातूचे पोषण होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळेच क्षयरोगासारखे आजार बरे होऊ शकतात.
७) शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेल्या अंजीराचे दोन भागात विभाजन करून त्यामध्ये गूळ भरून ठेवावा. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते.
८) नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.
९) मुखपाक या आजारात ओठ, जीभ, तोंड यांना कात्रे पडतात व फोड येतात. अशा वेळी अंजीर खाल्ल्यास या जखमा लवकर भरून येतात. तसेच कच्च्या अंजीराचा चीक या जखमांना लावावा.
१० ) मूळव्याधीवर अंजीर हे औषधाप्रमाणे कार्य करते. थंड पाण्यामध्ये दोन ते तीन अंजीर रात्री भिजत घालून सकाळी तेच अंजीर खावे. त्यामुळे शौचास साफ होऊन गुद्द्वाराची आग होत नाही. हा प्रयोग सलग महिनाभर केल्यास मूळव्याध हा आजार आटोक्यात आणता येतो.
११) अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व लोणी एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.
१२) अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो.
१३) पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.
१४) दम्यावरही अंजीर गुणकारी आहे. अंजीर आणि लालसर पांढरी गोरख चिंच समप्रमाणात घेऊन रोज सकाळी एक तोळा खावी. त्यामुळे श्वसन क्रिया सुलभ होत दम्याचा त्रास कमी होतो.
१५) अंजीराचा उपयोग गळवांवरदेखील करता येतो. अंजीर चटणीसारखे बारीक वाटून गरम करून त्यांचे पोटीस बनवावे. ते पोटीस शरीरावर आलेल्या गाठीवर किंवा गळवावर बांधावे. दर दोन तासांच्या अंतराने नवे पोटीस करून बांधल्यास वेदना कमी होतात आणि ती अपरिपक्व गाठ परिपक्व होते किंवा गळवा गळू लागते.
अंजीर खाताना काय सावधानता बाळगावी –
बहुगुणी अंजीर जसे उपयुक्त आहे, तसेच ते पचनालाही जड आहे. म्हणूनच अंजीर अतिप्रमाणात खाल्ल्यास अपचन होऊन अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणून पचनशक्तीचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणातच अंजीर खावेत. तसेच कृत्रिमरीत्या रासायनिक पूड वापरून पिकविलेले अंजीर अजिबात खाऊ नयेत.मधुमेह रुग्णांसाठी ताजे अंजीर उपयुक्त आहेत . मात्र सुके अंजीर हे डॉक्टरांच्या सल्याने घ्यावे.
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments
Post a Comment