वातदोष
वर्षा ऋतूच्या काळात- 1.अग्नि मंद झालेला असतो,
2.शरीरात वातदोषाचा प्रकोप झालेला असतो ,
3 शरीराची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते .
हे तीन मुद्दे एव्हाना तुम्हाला पाठ झालेचं असतील
त्यात सध्याच्या कोरोना साथीमुळे , सगळ्यांचा मानसिक तणावही खूप वाढलेला आहे ,त्यामुळे आधीच उणावलेली प्रतिकारशक्ती अजून खालावते.
अशा कसोटीच्या काळात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी ,
प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ,नेहमीच्या दिनक्रमात ,घरच्याघरी करता येण्यासारखे, अतिशय परिणामकारक पण साधे-सोपे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, आता त्याची थोडक्यात माहिती करून घेऊया व हे उपचार शक्य तेवढे आचारणातही आणूया .
कारण हे सर्व केवळ लेखाचे विषय नसून, प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत.
म्हटलेले आहेचं ना की,
एकतरी ओवी अनुभवावी.
अभ्यंग व उद्वर्तन-
अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला तेलाने मालिश करणे .
अभ्यंगाची सुरवात खरतरं साधारण दिवळीपासून करावी, पण वर्षा काळात होणारा वातप्रकोप लक्षात घेता, आठवड्यातून एक वेळा , सकाळी उपाशीपोटी, तिळाचे तेल ,नारायण तेल ,
चंदनबलालाक्षादि तेल किंवा आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने, योग्य ते तेल वापरून ,सर्व शरीराला, स्वतःचे स्वतःच अभ्यंग करण्यास हरकत नाही .
नंतर साधारण एक ते दोन तासांनी उद्वर्तन करून ,म्हणजे साबणाऐवजी चणा किंवा मसूर डाळीचे पीठ ,त्रिफळा चूर्ण ,उटणे अशी नैसर्गिक द्रव्ये शरीराला चोळून , गरम पाण्याने आंघोळ करावी .
अशा प्रकारे अभ्यंग व उद्वर्तन करून स्नान करून तर बघा,किती ताजेतवाने वाटते ते ...
अभ्यंग केल्यावर अगदी इन्स्टंट वाताचे शमन होते, त्यामुळे शरीराचा थकवा एकदम नाहीसा होतो. शरीर जणू रिचार्ज होते.
दिवाळी ते होळी या काळात अभ्यंग
नियमितपणे केल्यास तर लाभच लाभ आहेत तारुण्य दीर्घकाळापर्यंत टिकून राहते , डोळ्यांची दृष्टी ,शरीराची पुष्टी ,त्वचेची कांती, मनाची प्रसन्नता वाढते , आयुष्य वाढते
एवढे आकर्षक पॅकेज असल्यावर ,
आता आणखी काय पाहिजे ??
जर सर्व शरीराला अभ्यंग करणे शक्य नसेल, तर निदान डोके व पायाचे तळवे ,या शरीराच्या दोन्ही टोकांना (entry & exit) तरी नेहमी तेल लावावे .
तसेच नाक व कान यांना नेहमी आतून तेलाचे बोट फिरवावे .
जसे कुठल्याही यंत्राला ऑइलिंग केले की ते छान चालते , जास्त टिकते ,तसेच अहोरात्र कामात असणाऱ्या आपल्या शरीरालाही नियमित ऑइलिंगची गरज आहे .🙂
नस्य -
कोणत्याही प्रकारचे जंतू,धूळ ,धूर किंवा इन्फेक्शन शरीरात शिरण्याचा महत्त्वाचा रस्ता म्हणजे नाक.
सध्याचा कोरोना व्हायरस हा सुद्धा नाक व तोंड याद्वारेच शरीरामध्ये प्रवेश करतो .
नाकात तेल घालणे म्हणजे नस्य
अणू तेल , पंचेंद्रियवर्धन तेल, वा आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने योग्य असे तेल किंवा गाईचे तूप हे दोन्ही नाकपुड्यामध्ये सोडल्यास किंवा ते ही शक्य नसल्यास,
प्रतिसारण नस्य म्हणजे तेलाचे बोट नाकाला आतून फिरवल्यास ,नाकाच्या आतील श्लेष्मल त्वचेची प्रतिकारक्षमता सुधारते. सहजासहजी धूळ, जंतूंचा प्रवेश आतमध्ये होऊ शकत नाही.
हवेतून पसरणाऱ्या रोगांपासून नस्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्याला संरक्षण मिळते .
अगदी सहज सोपा, सर्वांना करता येण्यासारखा असा प्रतिसारण नस्य हा उपचार आहे .
सध्याच्या काळात तर, प्रत्येकाने प्रतिसारण नस्य दिवसातून 2 ते 3 वेळा अवश्य करावे .
धूपन-
धूपन म्हणजे सामान्य भाषेत धूप घालणे .
होम-हवन ,धूप,अग्निहोत्र या गोष्टी भारतीयांना नवीन नाहीत.
यासाठी गोवऱ्या ,तूप ,वेगवेगळ्या औषधी वनस्पती समिधा म्हणून पूर्वापारपासून वापरल्या जातात .धार्मिक कारणाबरोबरचं घरातील वातावरणाची शद्धी करणे हाही त्यामागील महत्वाचा उद्देश आहे. डास ,चिलटे, रोगजंतू नाहीसे करण्यासाठी धूपनाचे खूप महत्व आहे.
जेव्हा एखादी मोठी साथ येते तेव्हा त्या ठिकाणचा वायू, भूमी ,जल हे सर्व दूषित होते .यालाच आयुर्वेदात जनपदोध्वंस असे म्हटलेले आहे . यातील वायूच्या शुद्धीसाठी धूपनाचे अनन्यसाधारण महत्व आहे व आज ते आधुनिक विज्ञानानुसार ही सिद्ध झालेले आहे.
जिथे तेल, तूप, पाणी अशी कोणतीही स्थूल गोष्ट पोचू शकत नाही, अशा डोक्यातील बारीकसारीक सूक्ष्म पोकळ्यामध्ये धूर पोचू शकतो व तिथे जमलेल्या दूषित कफ दोषाला बाहेर काढून टाकू शकतो .
कडुलिंब,वेखंड, ओवा,भीमसेनी कापूर, मोहरी अशा वेगवेगळ्या औषधी वनस्पती गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांवर टाकून , सकाळ-संध्याकाळ त्याचा धूप घरात केला तर ,घरातील सगळ्यांच्याच नाकामध्ये मध्ये हा धूर जातो .
या औषधी धुरामुळे नाक ,कान,घसा, डोके यामधील कफ मोकळा होतो. डोक्यातील पोकळ्यात जमलेली सर्दी ,डोके जड होणे ,वास न येणे असे कफ साठल्यामुळे होणारे विकार नाहीसे होतात .
म्हणूनच अशा प्रकारचे धूपन सगळ्यांनी आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळी नियमितपणे करणे अतिशय महत्वाचे आहे .
गण्डूष -
गण्डूष म्हणजे गुळण्या करणे. याबद्दल सध्या आपल्याला सर्व प्रसार माध्यमातून वारंवार सांगितले जात आहे. आयुर्वेदाने गंडूष हा उपचार, स्वास्थ्यरक्षक व व्याधीनाशक म्हणून, हजारो वर्षांपूर्वीपासूनच सांगून ठेवलेला आहे.
हळद +मीठ / त्रिफळा / जेष्ठमध अशी औषधे गरम पाण्यात टाकून,ढवळून ,गाळून त्यात थेंबभर साजूक तूप घालून त्यानी सकाळ-संध्याकाळ गुळण्या केल्यास, घशातील व तोंडातील चिकटा, दूषित कफदोष निघून जातो . घशापासून सुरू होणारे व पुढे गंभीर होत जाणारे श्वसनाचे आजार, आपण केल्यामुळे रोखू शकतो .सकाळी उठल्यावर , रात्री झोपण्यापूर्वी तसेच बाहेरून आल्यावर गंडूष अवश्य करावे.
बस्ति -
बस्ति म्हणजे गुदमार्गाद्वारे औषधी तेल किंवा काढे आत सोडणे .
बस्ति हा वातदोषाचे शमन करणारा अत्यंत प्रभावी उपचार आहे. वर्षा ऋतूत वातप्रकोप झालेला असतो ,त्यामुळे वातदोष शमन करण्यात मातब्बर असणारा, बस्ति उपचार करून घेणे, वर्षऋतुत आरोग्य रक्षणासाठी अत्यावश्यक आहे .
कोरोनामुळे सध्या बरिचशी पंचकर्म चिकित्सालये बंद आहेत. त्यामुळे निदान सध्यापुरते, आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने, 50 ते 60 मि लि तिळाचे तेल कोमट करून ,त्यामध्ये थोडे मीठ घालून , पिचकारीच्या साह्याने आठवड्यातून एक-दोन वेळा बस्ति घेतल्यास, शरीरातील वातदोष नियंत्रणात रहायला बऱ्यापैकी मदत होईल .
कमी प्रमाणात म्हणजे, 50 ते 60 मिली तेलाच्या या बस्तीला मात्रा बस्ति असे आयुर्वेदात म्हटलेले आहे.
हा मात्रा बस्ति उपक्रम शक्य असल्यास, सध्यापुरता ,घरच्या घरी , पण आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने जरूर करावा .
आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा (प्रामुख्याने- वमन,विरेचन,बस्ति ,
नस्य व रक्तमोक्षण ) ही तज्ञ वैद्यांनी ,रुग्णाचे सर्व परीक्षण करून ,शास्त्रीय पद्धतीने ,जबाबदारी पूर्वक करण्याची चिकित्सा आहे. तरच काही दुष्परिणाम न होता, त्याचा उत्तम लाभ होतो. त्यामुळे पंचकर्म चिकित्सा घरच्या घरी करावी ,असे येथे बिलकुल सुचवलेले नाही.
सध्याच्या वातावरणाचा विचार करून , दैनंदिन जीवनात ,आपले आरोग्य, व्याधीक्षमत्व उत्तम राखण्याच्या दृष्टीने, सामान्य निरोगी लोकांनी, घरच्या घरी करण्याचे अभ्यंग ,उद्वर्तन ,नस्य ,गंडुष ,धूपन,मात्रा बस्ति हे उपक्रम इथे सुचवले आहेत ,अर्थात ते करतानाही आपल्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा .
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment