स्पॉन्डिलाइटिस घरगुती उपाय
मन्यास्तंभ ( Spondylitis , spondylosis )
मन्यास्तंभ कसा होतो हे सांगताना चरकाचार्य म्हणतात,
मन्ये संश्रितो वातो यदा अन्तर्नाडीः प्रपद्यते तदा मन्यास्तंभं कुर्यते । ....
चरक चिकित्सास्थान
दुष्ट झालेला वातदोष जेव्हा मानेतील नसेत जातो तेव्हा मन्यास्तंभ होतो.
प्रत्यक्षात हा अनुभव आहे मानेवर सतत ताण अशा अवस्थेत म्हणजे झुकून काम करणे , कॉम्प्युटरवर तास न् तास बसणे, आहारात पोषक व स्निग्ध पदार्थाचा अभाव वगैरे कारणांनी शरीरातील वातदोष असंतुलित होतो व त्याचे पर्यवसान स्पॉण्डिलायटीस मध्ये होते.
विश्रांती घेणे, कॉलर नेकच्या साहाय्याने मानेला आधार देणे, वेदनाशमक औषधे घेणे, तीव्र अवस्थेत ट्रॉक्शन घेणे वगैरे उपचार पद्धती प्रचलित असल्या व त्यांचा तात्पुरता योग्य उपयोग होत असला तरी स्पॉन्डिलाइटिस, स्पोंडीलोसिस खऱ्या अर्थाने बरा करण्यासाठी मुळावर उपचार करायला हवेत.
लहान मुल मान धरायला लागते तेव्हापासून त्याचा कणा वापरत असतो. म्हणजे साध्या साध्या हालचालीही उदा. मान वर करून पाहणे, झुकणे, वळवणे, बसणे,उठणे, चालणे, वाकणे या सर्व शारीरिक क्रिया पाठीच्या कण्याच्या लवचिकतेवरच अवलंबून असतात.
एखाद्या दिवशी चुकून झोपेत मान अवघडली तकी उत्पन्न होणारी त्रासदायक परिस्थिती आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेली असेल. म्हणून स्पॉन्डिलाइटिस होऊच नये यासाठी प्रयत्न करायला हवेत.
* सर्वप्रथम वर उल्लेखलेली कारणे टाळावीत. मांडी घालून बसताना, खुर्चीवर बसताना किंवा वाहन चालवताना ताठ बसावे. फार वेळ बसल्यामुळे पाठीला रग लागत असल्यास वाकून बसण्याची सवय न लावता पाठीला आधार द्यावा. त्यासाठी आवश्यक असल्यास उशांचा वापर करावा, मात्र वाकून बसू नये.
* दिवसभर कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्ती नियमित पाठीचे व मानेचे व्यायाम करावेत.
* चालताना किंवा उभे राहताना मान व एकंदरच पाठ ताठ ठेवावी,मान फार झुकलेली नसावी तसेच कंबरेलाही बाक येऊ देऊ नये.
* झोपताना फार जाड उशी घेणे टाळावे व गादी फार मऊ नसावी.
* वजन अवाजवी प्रमाणात वाढणार नाही याकडे लक्ष ठेवावे. कारण पोट सुटले की त्याचा परिणाम मानेवर होऊन त्रास होऊ शकतो.
* डोक्यावर अवजड गोष्टी घेणे टाळावे . तसेच जिम मध्ये वगैरे व्यायाम करताना एकदम सहन न होणारे व्यायाम करू नयेत.
* साध्या यंत्राला आपण वेळेच्या वेळी वंगण देतो , तर शरीराला, मणक्यांना, मानेला त्याची किती आवश्यकता असावी? मान, पाठ दुखायला सुरुवात होण्यापूर्वीच मानेला,पाठिला तेल लावावे. हे तेल वातशामक औषधी द्रव्यांनी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केलेले असावे.
* आहारात दूध, घरचे साजूक तूप, ताजे लोणी, खारीक , बदाम वगैरे स्निग्ध द्रव्यांचा समावेश करावा.
* हिवाळ्यात डिंकाचे लाडू खावेत.
* वर्षभर खारीक, बदाम , अश्वगंधा वगैरे वातशामक व शरीरपोषक रसायन सेवन करणे.
* स्पॉन्डिलाइटिस, स्पोंडीलोसिस त्रास सूरू असल्यासही वरील गोष्टी अमलात आणाव्यात.
वैद्य विश्राम माळाकोळीकर
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888,9420242484
निरोगी रहा, आनंदी रहा !!!!
Comments
Post a Comment