स्पोंडीलायटीस उपचार
स्पोंडीलायटीस उपचार
मागील पोस्ट मध्ये स्पॉण्डिलायटीस म्हणजे काय व इतर बाबींचा विचार केला. आपण यामध्ये उपचाराबद्दल पाहू सदरील उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत ..
* गोक्षुर, शतावरी,बला,अश्वगंधा वगैरे वनस्पती पासून बनवलेले रसायन चूर्ण दूध- साखरेबरोबर किंवा तूप- साखरेबरोबर घ्यावे तसेच सिंहनाद गुग्गुळ, अमृतादी गुग्गुळ वगैरे गोळ्या सेवन कराव्यात
* मानेला, पाठीला शास्रोक्त सिद्ध तेलाचा नियमित अभ्यंग करावा ( कुंडलिनी तेल). शक्य असल्यास शास्त्रीयदृष्ट्या मानेचे सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडून मालिश करून घ्यावी.(कुंडलिनी मसाज).
* शेक करणे हाही वेदना कमी करण्यासाठी व वात संतुलनासाठी एक उत्तम उपाय होय. अगोदर तेल लावलेल्या जागी निर्गुडीचा किंवा एरंडाचा पाला वापरून शेक करावा. (मागील एका पोस्ट मध्ये सांगितले आहे)
* वातशमन करण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपचार म्हणजे बस्ती. स्पॉन्डिलाइटिस मध्ये बस्ती चा उत्तम उपयोग होताना दिसतो. दशमूळादि औषधी द्रव्यापासून तयार केलेल्या तेलाचा किंवा दुधाचा बस्तीसाठी वापर करता येतो.
* मान व पाठीचा कणा लवचिक व कार्यप्रवण राहण्यासाठी खालील साधी योगासने रोज आवश्य केल्याने स्पॉन्डिलाइटिस व्हायला प्रतिबंध होतो पण असलेला स्पॉन्डिलाइटिस बरा व्हायला मोलाची मदत होईल.
* मानेची लवचिकता खांद्याच्या आजूबाजूचे स्नायू, मान संपून धड सुरू होते तेथील स्नायूवर अवलंबून असते. अति मानसिक ताणामुळे नेमक्या याच ठिकाणी कडकपणा येतो ,परिणामत: स्पॉण्डिलायटीस सारखे विकार संभवू शकतात. त्यासाठी मानसिक ताण वेळेच्या वेळी कमी करण्यासाठी योगनिद्रा करावी, इतर मनःशांतीकारक स्वास्थ्यसंगीत ऐकावे. तसेच योग्य मार्गदर्शनाखाली स्नायू मोकळे करून घ्यावेत.
* रोजच्या व्यायामाबरोबर या क्रियांचा अंतर्भाव करावा. जमिनीवर किंवा खुर्चीवर बसावे हनुवटी सावकाश छातीजवळ आणावी व आपण 'हो' म्हणताना जशी मान करून खाली डोलवतो तशी डोलवावी. ही डोलवण्याची क्रिया करत असताना हळूहळू हनुवटी उजव्या खांद्याजवळ आणावी. मात्र खांदा हलणार नाही याची काळजी घ्यावी. यानंतर हळूहळू डाव्या खांद्याकडे मान न्यावी . अशा प्रकारे सात-आठ वेळा करावे. ही क्रिया करत असताना श्वासोश्वास नेहमीप्रमाणे पण शांतपणे चालू ठेवावा. ही क्रिया समजली नसेल तर Video तयार करून share केला जाईल, फक्त आपल्या प्रतिसादाची अपेक्षा.
* या क्रियेमुळे खांद्याचे व मानेचे स्नायू मोकळे होतात, मानेची लवचिकता वाढते , खांद्यातील व या भागात साचलेला ताण टेन्शन कमी व्हायला मदत होते. दिवसभर कम्प्युटर वर काम करण्याऱ्यासाठी एक आदर्श क्रिया आहे.
* योगासना पैकी ताडासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, परिवर्तीत चक्रासन, तसेच संतुलन क्रियायोगा'तील 'समर्पण' व 'शाबास ' या क्रियांचा स्पॉन्डिलाइटिसचा प्रतिबंध करण्यासाठी उपयोग होतो.
वैद्य विश्राम माळाकोळीकर,
श्रीराम आयुर्वेदिक,
7350911888,9420242484
निरोगी रहा, आनंदी रहा !!!
Comments
Post a Comment