नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज
नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज
प्रश्न:
नाडी परीक्षणाची बलस्थाने आणि व्याप्ती काय आहेत?
उत्तर:
रोगाक्रान्त शरीरस्य स्थानान्यष्टौ परीक्षयेत् ।
नाडी मूत्रं मलं जिह्वां शब्दस्पर्शदृगाकृती।।
(योगरत्नाकर)
रुग्णाच्या शरीरातील पुढील आठ स्थानांचे योग्य परीक्षण करावे - नाडी, मल, मूत्र, जीभ, शब्द, स्पर्श, दृष्टी आणि आकृती.
वैद्य नाडी तपासतात म्हणजे नेमकं काय करतात?
- आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. ते मनगटावर नाडी पाहणाऱ्याच्या अनुक्रमे तर्जनी, मध्यमा आणि अनामिका यांवर व्यक्त होत असतात. याच क्रमाने का? जडत्वानुसार! सगळ्यात हलका असलेला वात, मग पित्त आणि सरतेशेवटी सगळ्यात जड कफ. त्यांतही प्रत्येकाचे पाच उपप्रकार लक्षात घेता प्रत्येक बोटाच्या नेमक्या कोणत्या भागावर, कोणत्या वेळी आणि कशा प्रकारचा (अंतर, लय इ.) स्पर्श जाणवतो याचा आढावा घेण्याचं काम आपले वैद्य करतात.
नाडीवरून काय काय लक्षात येतं?
- योग्य दोष योग्य वेळी व्यक्त होत असल्यास प्राकृतावस्था आणि नसल्यास त्या दोषाच्या क्षेत्रात असलेली गडबड! उदा. अपानवायूची नाडी व्यक्त होत असल्यास रुग्णाला मूत्र, मल, शुक्र वा मासिक पाळी यांपैकी एक वा अधिक वा सर्वच बाबींत तक्रार असण्याची शक्यता आहे हे वैद्यांना लक्षात येतं. असे पंधरा विविध भाव आणि त्यांच्याशी संबंधित शरीराचं कार्य यांचा अंदाज नाडी देते.
नाडीपरीक्षण हा सोनोग्राफी वगैरे आधुनिक तंत्रज्ञानाला पर्याय आहे का? नाडीपरीक्षणातून आपल्या मागच्या काही पिढ्यांचे वा जन्मीचे आजार कळतात का?
- मुळीच नाही!
नाडीपरीक्षणाशिवाय आयुर्वेदीय निदान होऊच शकत नाही का?
- नाडीपरीक्षणाला आयुर्वेदात महत्व असले तरी ते absolute नाही. अन्य सात बाबींसहच तपासण्याची एक बाब म्हणजे नाडी. जिथे नाडीपरीक्षण शक्य नाही तिथे ते न करताही अन्य परीक्षणांद्वारे निदान करणं सहज शक्य असतं. यात कित्येकदा तंत्रज्ञानाची मदतही घेता येते. याबाबत नंतर सविस्तर लिहीन. मात्र आधी श्वसनक सन्निपाताचे रुग्ण आणि आता टेलिकंसल्टिंग यांत नाडीपरीक्षण न करताच तर सारं काम सुरू आहे! श्वसनकाच्या रुग्णांत तर आयुर्वेदीय निदानपद्धती आणि तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घातली गेली. नाडीपरीक्षण केलं नाही तर आयुर्वेदीय उपचार देणं शक्य नाही हा गैरसमज आहे.
नाडीपरीक्षण हा वरवर पाहता वैद्यपरत्वे निरीक्षण बदलेल असा विषय वाटत असला तरी प्रत्यक्षात अत्यंत काटेकोर चाकोरीत हे काम होत असल्याने क्वचितच तसं घडतं. वैद्यांची पूर्ण एकाग्रता आणि निरीक्षणाचा अनुभव अत्यंत महत्वाचा. अनेक दंतकथा जोडला गेलेला विषय असल्याने आपल्याला त्याचे अप्रूप वाटत असते. काहींना ते थोतांड वाटतं तर काहींच्या अतिरंजित कल्पना असतात. प्रत्यक्षात मात्र अवाढव्य अशा आयुर्वेदीय निदानप्रणालीचा एक अवयव म्हणजे नाडीपरीक्षण. मात्र केवळ त्याकडेच लक्ष देऊन आपले निदान वा उपचार होत नसतात!
वैद्य विश्राम माळाकोळीकर
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888
आनंदी रहा , निरोगी रहा !!
Comments
Post a Comment